...

3 views

आभार गत वर्षाचे 🙏🙏
स्वतः ची ओळख लाभली,
जेथे कलेचे होते सर्व पुजारी,
दिग्गजांची भेट जाहली,
आरंभ करणारा जानेवारी.

हा महिना भारी प्रेमाचा,
साहित्याची ज्याने केली चाकरी,
असा आपल्या कुसुमाग्रजांचा
मराठी दिन असलेला तो फेब्रुवारी.

इथे तर विशेष महिना ,
म्हणावा तर खरा अचर्च,
जन्मदिनी कलेचा दागिना,
चढवणारा हाच तो मास मार्च.

एप्रिल होता फार खास,
कुटुंबासमवेत चे गोड क्षण,
सुखाच्या सोबतीला जिव्हाळ्याचे घास,
गुरू कृपेने सारेच आयुष्य सुलक्षण .

कडक उन्हात न्हाऊन काढणारा,
जुन्या गाठींनी मन मोहरले,
पुन्हा लेखणीच्या सावलीत रमणारा,
तेजस्वी महिना ऊजळला मे.

जून ची गोष्टच निराळी,
केशरी रंग लेवुनी आला,
नव्या पर्वाची चाहूल येथे लागली,
एक अंधूकशी वाट दावूनी गेला.

सरत्या महिन्यात आनंदाची भर पाडणारा.
देवी आईचा वरद हस्त पुनश्च अनुभवला,
पुढील वाटचालीस नितळ करणारा,
जुलै एक अविस्मरणीय ठरला.

आल्यारशी ऑगस्ट लगेच संपला,
मैत्रिणी व कुटुंबाचा देऊन सहवास,
अनेक गोष्टींचा सोक्षमोक्ष लागला,
गतीशील होता हाच अधिकमास.

प्रारंभी गोड भाच्याचे निखळ हास्य,
हळव्या निरोपांची सुखद मैफल
आप्तेष्टांचे अभीष्ट सौमनस्य,
जणू श्री गणेशाचे सारे सुफल .

नववा महिना की नवा प्रवास,
कशाचे भान शिल्लक नव्हते,
प्रेरक होती उड्डाणाची आस,
वंदून मातृभूमीला केलं नमस्ते.

नवी वास्तू , नवा देश, नवी भाषा,
एकत्र घेऊनी ऑक्टोबर डोकावला,
पूर्त करत अनेक अभिलाषा,
दृष्ट विरहित ठेव आई आमच्या सौख्याला.

जिद्द न् कष्टाच्या आहुतीला सलाम,
महत्वकांक्षा माझ्या पित्याकडून शिकावी,
स्वतः च्या नावाचे सदन इतुके अभिराम,
तुमची चिकाटी थोडी मी ही घ्यावी.

हिमक्रिडांचा मोह आवरेना,
अन्वेषणाचा चंगच बांधला,
बघता बघता थबकला डिसेंबर महिना,
मनःपूर्वक धन्यवाद आमचा गत वर्षांला.

...... 📝 गेयता.
© All Rights Reserved