...

5 views

सर्व्हे नंबर २५ - भाग ११
सर्व्हे नंबर २५ - भाग ११



सिम्बा आणि सीमंतिनीला शोधता शोधता मी त्याच माती खोदलेल्या जागेजवळ येऊन पोहोचलो. मनामध्ये धडकी भरली होती. श्वास फुलला होता. भीतीने मनावर ताबा मिळवला आणि माझी वाणीसुद्धा बाधित झाली. आवाज फुटेनासा झाला. मनातल्या मनात देवभुबाबांचा धावा चालू केला. त्यांनी दिलेली जटा रुमालाने हाताला बांधली. काही होवो न होवो, मनाची समजूत निघाली होती. पुन्हा एकदा जोर एकवटून आवाज दिला. गार्डनमध्ये माझा आवाज घुमला आणि सीमंतिनीचाही प्रतिसाद ऐकू आला.

"सीमंतिनी ती जटा हातामध्येच ठेव, लवकर इकडे ये" मी ओरडून सांगितले. सीमंतिनी सिम्बा जवळ पोहोचली होती. आणि तिच्या समोर होती तीच लालबुंद निखाऱ्याने धुमसणारी विडी. काळोखात बाकी काहीच दिसत नव्हते. पणं इकडून तिकडे फिरणारी, अधांतरी भासणारी विडी मात्र दिसत होती. विडीकडे पाहून सीमंतिनी गोंधळली. माझ्या आवाजाकडे तीच दुर्लक्ष झालं. घाबरलेला सिम्बा तेथून पळाला. तो थेट माझ्यापर्यंत आला. मी सिम्बाला उचलून घेतले, पणं .... सीमंतिनी......

सीमंतिनीचा शोध मला अजून लागला नव्हता. सिम्बाला घेऊन आवाजाच्या दिशेने मी चालू लागलो, पण घाबरलेला सिम्बा मात्र पुढे यायला तयार नव्हता. पुन्हा एकदा शक्ती एकवटून त्याने मला झटका दिला आणि माझ्या हातातून सुटका करत घराकडे पळून गेला. सिम्बाला पकडायचं कि सीमंतिनीला शोधायचं?, कोणत्या दिशेला जायचं? या द्विधा मनस्थितीत मी अडकलो. आणि आपसूकच सीमंतिनीच्या शोधासाठी पावले वळली.

तिकडे सीमंतिनी घाबरूनच बेशुद्ध झाली होती. माझा आवाज घेण्यास आणि मला प्रतिसाद देण्यास ती असमर्थ होती. बघता बघता तो लालबुंद निखारा सीमंतिनीला खेचतच घेऊन गेला.

आवाज देत देत मी घराच्या मागच्या डाव्या बाजूला असलेल्या टाकीजवळ पोहोचलो. आणि तेवढ्यात लाईट आली. मला थोडे हायसे वाटले. उजेडात शोधणं सोपं होणार होत. कंबरेवर हात ठेवून इकडे तिकडे पाहत असतानाच मातीवर काही खेचत नेल्याच्या खुणा अस्पष्ट दिसल्या. मी घाबरलो. मनोमनी खात्रीच झाली. सीमंतिनीला त्याच दिशेने खेचत नेलं असावं. पुढे काही अंतरावर तिच्या चपला पडल्या होत्या. देवभुबाबांनी दिलेली जटा एका बाजूला गवतावर अडकून पडली होती. ती मी उचलून घेतली. हातातील बांगड्या फुटून अस्तव्यस्त पसरल्या होत्या. मागोवा घेता घेता मी टाकी आणि कुंपणाच्या कोपऱ्याजवळ आलो. कुंपणाच्या खालुन एक मोठा गोल सिमेंट चा ड्रेनेज पाईप बाहेर काढला होता. पाईप च्या बाहेरील टोकाजवळ एक वडाचे भले मोठाले झाड होते. पुढे खुणा अस्पष्ट असल्या तरीही त्याच दिशेने सिमन्तिनीला शोधावे लागणार होते. मी भिंतीवर चढून कुंपण पार केला.


वडाचे झाड काळोखात खूपच भयानक भासत होते. दुरून येणाऱ्या प्रकाशाने वर वर काही पाने चमकत होती. खाली पालापाचोळ्याचा मोठा थर साचला होता. त्यावर पाय पडताच कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज कानामध्ये गोंधळ निर्माण करत होत. भीती वाटत होती तसा मी देवभुबाबांचं स्मरण करून त्यांचा नामजप जोरजोराने करू लागलो. हळुवार पावले टाकत वडाच्या खोडाजवळ पोहोचलो. वडाचे ते भलेमोठे दिसणारे झाड आतून मात्र पोकळ होते. खोडामधल्या पोकळ भागात २ ते ३ जण सहज मावु शकतील एवढी मोकळी जागा होती. देवभुबाबांच्या नामस्मरणाने थोडी भीती कमी झाली होती. शिवाय सीमंतिनीला शोधायचं तर घाबरून चालणारही नव्हतं. मी हिम्मत करून झाडाच्या एका बाजूला पकडून आत पाऊल टाकले. किर्रर्र काळोख आणि कुबट दुर्गंधीने जीव गुदमरत होता. खालची माती मऊ मऊ लागत होती. पुन्हा थोडं बाहेर येऊन दोन्ही हातांनी झाडाला पकडलं. झाडाच्या गाभ्यातील मातीवर पाय आपटले त्यासरशी आतमध्ये पोकळी निर्माण झाली. पायाच्या हादऱ्याने माती खाली कोसळत होती. एका बाजूला छोटे भगदाड पडले होते. कदाचित वडाचे झाड जुन्या एखाद्या गुप्त वास्तूला गाडून वर उभे राहिले असावे.

आधीच काळोख त्यात आणखी खोलवर भगदाड आणि जीव गुदमरणारी कोंदट दुर्गंधी त्यामुळे आत जाणे जिकिरीचे जाणवत होते. मी धावत जाऊन चार्जिंग ची लाईट, मोबाईल बरोबर घेतले. सिम्बा मला पाहून धावतच जवळ आला. जटेमधले काही केस सिम्बाच्या मानेजवळ बांधले. त्याच विव्हळणं काही क्षणात कमी झालं. मी सिम्बाला घेऊनच पुन्हा त्या वडाजवळ आलो. चार्जिंगची लाईट झाडाच्या आतील पोकळ भागात टांगून ठेवली. मोबाईल खिश्यात ठेवून त्या भगदाडात डोकावलं. झाडाच्या आतील खोडालगत रक्त लागले होते. मी सीमंतिनीला आवाज देऊ लागलो. प्रतिसाद येत नव्हता. वेळ न दवडता मी आत उतरू लागलो. अडखळत, अंग घासत, जोर लावत, कसाबसा मी आत उतरलो. मोबाईलच्या फ्लॅश मध्ये पाहिलं, वरून छोटं भगदाड आत थोडं जास्त पोखरलेल होत. गुडघ्यांवर चालत आत जात राहिलो. काही अंतरावर आतील भाग विस्तारलेला होता. अनेक ठिकाणी हाडांचे अवशेष विखुरले होते. मोबाईल फ्लॅशच्या उजेडात वर पाहिलं, वर निमुळती होत गेलेली आणि त्यावर दगडी आवरण ठेऊन बंद केलेली ती एक छोटेखानी गुफा अथवा गुप्त जागा वाटत होती. कदाचित मी खोदकाम केलेली जागा तीच असावी, अशी मनात शंका आली, नव्हे खात्रीच झाली. मोबाईलची फ्लॅश चौफेर फिरवून पाहिली, काही छोट्या वाटिका आत खोदलेल्या दिसल्या. एका वाटीकेजवळ जाऊन पाहिलं, ती वाट पुढे बंद होती. दुसऱ्या वाटेने गेलो. पुढे काही रडण्याचा, हुंदक्यांचा आवाज ऐकू येऊ लागला.

मी पुन्हा सीमंतिनीला आवाज देऊ लागलो. आतील काळोख मोबाईलच्या उजेडालाही खात होता. त्यामुळे प्रकाश फारच कमी वाटत होता. एक एक पाऊल पुढे टाकत, देवभुबाबांचं नामस्मरण करत मी एका दगडाजवळ पोहोचलो. अचानकच विडी जळत असल्याचा वास येऊ लागला. मागे वळून पाहिलं, तेच दोघे माझ्यावर नजर रोखून पाहत होते. विडीवाला तोच म्हातारा एका हातात सीमंतिनीची केसं पकडून उभा होता. चेहऱ्यावर रागाशिवाय कोणतेच भाव नव्हते. भयंकर कुरूप, धिप्पाड आणि क्रोधीत असे हाणम्यादा आणि ताईची ती जोडी आता मला आणि सीमंतिनीला मारूनच टाकणार याच आवेशात हळूहळू पुढे येत होते. मी दोन्ही हात जोडून त्यांना विनवणी केली. माफी मागितली. परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सीमंतिनी अर्धमेली झाली होती. तिच्यात त्राण उरले नव्हते. वेदनेने आणि भीतीने ती फक्त विव्हळत होती. सुटका होण्यासाठीची तिची धडपड थांबली होती. मला काहीही करून सीमंतिनीला हाणम्यादा च्या तावडीतून सोडवायचं होत. देवभुबाबांचा नामजप करत मी पुढे सरसावलो. हातावर बांधलेल्या जटा सुरक्षित होत्या. खिशामध्ये सीमानितीला दिलेल्या जटा होत्याच. मी पुढे येतोय हे पाहून हाणम्यादा आग ओकत, चवताळून माझ्यावर चालून आला. मनात भीतीची कळ उठली. त्याने उगारलेला हात अडवण्यासाठी मी आपसूकच हात वर केले. देवभुबाबांनी दिलेली जटा त्याच्या हाताला लागताच हाणम्यादा चा भूत ओरडला. दोन पावले मागे सरला. पुन्हा त्याच द्वेषाने ते दोघेही माझ्यावर चालून आले. यावेळी मी आत्मविश्वासाने सामोरा गेलो.

दोन पावलांवर थोडा वाकून मी सीमंतिनीच्या दिशेने तिच्या जवळ गेलो. खिश्यातुन जटा काढत तिच्या हातावर बांधली. आता ती सुद्धा सुरक्षित असल्याची मला खात्री झाली. माझा हात पुढे करत, मी आता दोघांच्याही दिशेने पुढे सरकू लागलो. मला त्यांच्याशी लढायचं नव्हतंच. सीमंतिनीला सांभाळत, जटेने दोघांच रक्षण करत हाणम्यादा नी ताईचे घाव चुकवत मी सीमंतिनीला घेऊन बाहेर आलो. रक्तबंबाळ आणि अर्धमेली झालेली सीमंतिनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली होती. देवभुबाबांचे स्मरण करून आम्ही दोघांनी हात जोडले, डोळे बंद केले. हवेच्या झुळुकीबरोबर कानात मंदमंद घंटानाद चालू झाला. आम्ही संकटातून सुखरूप बाहेर पडल्याची ग्वाही मिळाली.

लागलीच सिम्बा आणि सीमंतिनीला घेऊन मी दवाखान्यात दाखल झालो. आता सिम्बा आणि सीमंतिनी दोघेही ठीक होते.
"आता तो खजिना हि नको आणि त्या फार्महाऊस चे रहस्य हि नको, जान बची लाखो पाये" असा विचार मनात येऊन गेला. पुढे देवभुबाबांच्या मार्गदर्शनाखाली हाणम्यादा आणि ताई च्या भुताची पाठवणं करण्याचं ठरवलं आणि तोवर सर्व्हे नंबर २५ च्या फार्महाऊसवर जायचं नाही असा ठाम निर्णय घेतला.

-------------------------------------------------------समाप्त-------------------------------------------------------

© SURYAKANT_R.J.