...

6 views

सर्व्हे नंबर २५ - भाग ७
सर्व्हे नंबर २५ - भाग ७



मन स्थिर नव्हते. आधीच हाणम्यादाच्या प्रकरणाने मन विचलित झालेले, त्यात हे खड्ड्याचे रहस्य. घरात स्वस्थ बसवत नव्हते. मी वारंवार खोलीत फेऱ्या मारत होतो. येरझाऱ्या मारता मारता खिडकीतून खड्ड्याकडे नजर लावत होतो. बाहेर थंडी खूपच वाढली होती. धुके पसरायला लागले होते. वाहनांची तुरळक आवाजाही होत होती. आणि पुन्हा कुत्र्यांच्या भुंकण्याने बाहेरील शांतता भंग होत होती. मी जसा विचारात होतो तशीच सीमंतिनीही. जेवण बनवत असली तरीही ती आज शांतच होती. कामाचा थकवा होताच. गरमा गरम जेवण आटोपून आम्ही लवकर झोपी गेलो. सिम्बासुद्धा अंगावर चादर घेऊन शांत झोपला होता. रात्रीचे १२.३० वाजले असतील, बाहेर कसलातरी पुसटसा आवाज येऊ लागला. सीमंतिनी आणि सिम्बा गाढ झोपेत होते. मला जाग अली. अंथरुणातील गर्मीतून उठून थंडीत कुडकुडत निघायचा कंटाळा आलेला. लाईट्स अचानकच गेली आणि सर्वत्र काळोख पसरला. मी चाचपडत, हळूहळू मोबाईल शोधू लागलो. कोपऱ्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल घेऊन त्याची फ्लॅश चालू केली.

अंगात स्वेटर घातला होता. कानटोपी घालून, एका हातात काठी घेऊन मी दरवाज्याची कडी उघडली. हळूच दरवाज्या उघडून बाहेर आलो आणि दरवाज्या पुन्हा ओढून घेतला. मोबाईलची फ्लॅश सभोवार फिरवून त्याच्या उजेडात काही दिसतंय का पाहिलं. थंडीमुळे दात कडकडत होते. हात थरथरत होते. अंगावर शहारे येत होते. पायात चप्पल घालून मी आवाजाचा कानोसा घेत पुढे जाऊ लागलो. शांतपणे, अधून-मधून आवाज येतच होता. पणं नक्की आवाजाची दिशा समजत नव्हती. पावले संथ टाकत मी मातीच्या ढिगाऱ्यावर चढलो. मोबाईल बंद पडला आणि मी घाबरलोच, मनात धडकी भरली. आता तर धड पुढेही जाता येणार नव्हतं आणि मागेही. मी जोराने ओरडून सीमंतिनीला आवाज देऊ लागलो. थंडीमुळे आवाज जास्त फुटत नव्हताच आणि गाढ झोपेमुळे आणि दरवाज्या आड केला असल्याने तिलाही आवाज जात नव्हता. मी शांत झालो. जागेवर उभा राहूनच मान वळवून पाहू लागलो. मिट्ट काळोखाशिवाय काहीच नव्हते. थोडा वेळ खड्ड्याच्या दिशेने काळोखात नजर लावून उभा राहिलो. एक मंद लाल निखार्याचा ठिपका चमकताना दिसला.

डोळे चोळून नक्की काय आहे याची खात्री करू लागलो आणि घाबरलोच. छातीत धडकी भरली, दृदयाची धडधड वाढली. कदाचित तीच पेटती विडी असेल, डोक्यात विचार आला. कसला तरी आवाज मात्र एका बाजूने येतच होता. मी हिम्मत एकवटून विचारलं, "कोण आहे तिकडे, काय करताय". समोरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. आता आवाज मात्र वाढला होता. धप्प .... धप्प... धड्ड ... सर्रर्रर्र ... माती दगड-धोंडे खड्ड्यात पडत असल्याचा आवाज. काही क्षण उभा होतो तोच, माझ्या पायाखालची माती सरकू लागल्याची जाणीव मला होऊ लागली. माझा तोल जाऊ लागला. मी स्वतःला सावरत मागच्या बाजूला झेपावलो आणि मातीवरून घरंगळत खाली कोसळलो. मी खूपच घाबरलो होतो. स्वतःला सावरण्याची हिम्मत उरलीच नव्हती. हातातली काठी आणि मोबाईल कुठे पडला काहीच कळत नव्हते. सावरायला थोडा वेळ घेतला आणि हिम्मत एकवटून पुन्हा उभा राहिलो. आता नक्की काय ते पाहायचंच असा निर्धार करून मोठ्या हिम्मतीने पुन्हा मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन उभा राहिलो. जीव एकवटून आवाज दिला,"कोण आहे तिकडे, समोर या" माझ्या ओरडण्याचा आवाज बहुतेक सिम्बा पर्यंत गेला असावा. त्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.

त्याच्या भुंकण्याने सीमंतिनी उठली. मी घरात नाही हे पाहून तिच्या मोबाईल ची फ्लॅश चालू करून ती बाहेर आली. माझ्या ओरडण्याचा आवाज तिनेही ऐकला. "काय झालं, का ओरडतोस?" म्हणत तीसुद्धा मातीच्या ढिगाऱ्याजवळ आली. आत पडलेली माती मोबाईलच्या फ्लॅश मध्ये दिसत होती. आजूबाजूला कोणीही नव्हते. मला घाम फुटला होता. हो,... कडाक्याच्या थंडीत चक्क घामाने भिजलो होतो.

"सीमंतिनी, खड्ड्यात कोणीतरी होत. मी पहिले, ती विडी.....तो....."

मी सीमंतिनीला जोरजोरानेच सांगत होतो.

माझी अवस्था पाहून सीमंतिनीने मला शांत केलं. "आधी तू शांत हो, बघ आता कोणी नाही तिथे, आणि तू एकटा का आलास, मला उठवायचं तरी". सीमंतिनीने माझी समजूत काढली.

भांबावलेल्या अवस्थेत आम्ही दोघे थोडा वेळ तिथे उभे राहिलो आणि नंतर निमूटपणे खोलीत गेलो. दरवाज्या बंद करून मी आडवा झालो. सकाळ होईतोवर धीर धरवत नव्हता. आणि बाहेर निघायची हिम्मतही होत नव्हती. थोड्या वेळाने सीमंतिनी शांत झोपी गेली. पुसटसा आवाज अजूनही येतच होता. मी दुर्लक्ष करून झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप काही लागली नाही. पहाट होईतोवर बाहेरील आवाज बंद झाला. उरली होती घड्याळाच्या काट्याची टिक टिक, सीमंतिनीच्या घोरण्याचा आवाज आणि अधूनमधून एखादी गाडी जाण्याचा आवाज.

पहाटेच्या अंधुक प्रकाशाने काळोखाचे सावट दूर झाले. मी सीमंतिनीला जागे केले. आळस देत ती पण उठली. आम्ही दोघे बाहेर आलो आणि जागेवरच स्तब्ध उभे राहिलो. सीमंतिनीची झोपच उडाली. काल खोदलेला १० फुट खोलीचा खड्डा पूर्णपणे मातीने भरलेला. सीमंतिनी अवाक झाली. माझीही बोलती बंद झाली. सीमंतिनी खड्ड्याच्या जागेजवळ जाऊन बसली. मातीला हात लावत कधी जमिनीकडे, कधी माझ्याकडे ती पाहू लागली.

डोळ्यासमोर अंधारी आली आणि डोक्याला हात लावून ती तिथेच पडली. मी जाऊन तिला सावरू लागलो. तिला धीर देऊ लागलो. तिच्यासाठी असे आश्चर्य प्रथमच असेल. आता मात्र तिलाही हालीने सांगितलेल्या गोष्टी आठवू लागल्या.

"हे. कसं शक्य आहे, म्हणजे हाली म्हणते तसं काही....?" सीमंतिनी बोलता बोलता गप्प झाली.

मी सुद्धा गुडघ्यांवर बसून तिच्या खांद्यावर हात ठेवला.

"सीमंतिनी, मलाही ते जोडपं दिसलं आहे, देवज्याबा ने सांगितलेल्या गोष्टीत काहीतरी तथ्य असेल". मी म्हणालो.

"आता काय करायचं, आपण एवढा पैसे गुंतवला, जागेत जीव लावला आणि आता... मला हे घर, हि जागा , नाही सोडवणार" सीमंतिनी माझ्याकडे पाहून रडवेल आवाजात बोलू लागली.

"ह्म्म्म... बघू, काहीतरी पर्याय असेलच ना". मी सीमंतिनीची समजूत काढून धीर देऊ लागलो.

सिम्बा त्या मातीमध्ये नाक खुपसून, मातीचा वास घेत होता. पायाने माती उकरत होता. आणि मध्येच गुरगुर करत भुंकत होता. त्याला काही सूचित करायचे होते किंवा सांगायचे होते. पण आम्ही दोघेही टेन्शन मध्ये होतो. त्याची भाषा समजण्याइतपत आम्ही सावध झालो नव्हतो.

"बाबूला भूक लागले वाटतंय, बघ त्याला काही खायला दे" सीमंतिनीने मला सांगितलं.

मी आत जाऊन सिम्बासाठी काही बिस्किट्स आणले. त्याच्या जवळ जाऊन त्याला खाऊ घालू लागलो. इकडे तिकडे पाहता पाहता अचानकच नजर गेली मातीने भरलेल्या खड्ड्याच्या एका कोपऱ्यामध्ये आणि "आ" वासून माझी पावले आपसूकच तिकडे वळली.
© All Rights Reserved