...

1 views

जाणता
ममत्व आणि जनत्व
जाणणारा तो............जाणता !
प्रजा हित जोपासणारा
तो..................राजा !
आणि या सर्व गोष्टी
उराशी बांधून कार्य करणारा
तो.................जाणता राजा !!

राजे तुम्हाला समजून घेणं
आम्हाला कधी जमलंच नाही
म्हणून "समजून" सांगणंच
आम्ही पसंत केलं...

तुमच्या जयंती-पुण्यतिथीत
आम्ही तल्लीन होऊन जातो
तुमच्या कार्याचा मात्र विसर पडतो...

राजे तुमच्या नावाचा जयघोष
आम्ही कुठेही कधीही
इतका ओरडून करतोय
की...शिवा-जी हा आदरयुक्त शब्द आहे
हेच विसरून गेलोय...

तुम्ही नाही केला कधी
भीमा, तुका, रामा आणि गफ्फार मध्ये भेद
इथं मात्र फुटाफूटावर
सापडतील तुम्हाला असंख्य छेद
याचाही आम्हाला कसा वाटत नाही खेद...

अमावस्या असो
असो पौर्णिमा
कधीही तुम्ही शत्रूंशी लढले
इथं मात्र तिथी अन् तारखेवरून
मावळेच एकमेकांशी भिडले...

राजे तुम्ही स्वराज्यासाठी
जीव पणाला लावून
दुश्मनांशी लढले
पण त्याच स्वराज्याला
संपवण्यासाठी दुसऱ्या कोण्या
अफजल खानाची गरज
आता उरली नाही...

राजे तुम्ही माझे आहात
हे मला सिद्ध करावं लागतंय
त्यांना...
ज्यांनी तुम्हालाच समजून घेतलं नाही
ही शोकांतिका नेमकी कोणाची ?

राजे आम्ही तुमची
एक सोय केलीय
पुढची पिढी तुम्हाला
एकाच रंगात आणि ढंगात ओळखेल...
हेच होतं ना तुमचं स्वप्न ?
याचा तुम्हालाही प्रश्न पडेल...

राजे तुम्ही जाणता होतात
आहात...
आणि सदैव राहणार...!!
आम्ही जनताच होतो
आहोत...
आणि वाटतं राहणार...!!

आशा आहे पुन्हा एकदा
ज्वालामुखीचा उद्रेक होईल
सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यांना
जाग येईल
अन् पुन्हा एक जिजाई
शिवबाला जन्म देईल...!!