...

3 views

Valentine च्या निमित्ताने .... सांग ना सये काव्यसंग्रहा बाबत
या valentine day निमित्ताने माझा पहिलाच काव्य-संग्रह थोड्याच दिवसात प्रकाशित होत असुन अगदीच वाजवी दरात फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि नोशनप्रेस्स या संकेतस्थळांवर उपलब्ध असतील.

तर नक्कीच आपल्या आवडत्या व्यक्तीला आवर्जून भेट देता येईल असे हे पुस्तकं नक्की खरेदी करा. आणि प्रेमातील वेगवेगळ्या प्रसंगांचा आस्वाद घ्या.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

समर्पण :-

💖💖💖💖

माझ्या देहावरती निखळ प्रेम करणारे माझे मन. देह आहे तोवर त्याचीच साथ देण्याची त्याची निष्ठा आणि आत्मविश्वास. हेच अंतिम सत्य म्हणून देह आणि मन यांचे बंधन एकरूप करून अखंड आयुष्य व्यतीत करण्याची हमी देणारे माझे निरागस आणि निस्वार्थी प्रेम. हे दोघे आहेत तोवर सर्व लढाया लढणार, हरलो तरीही पुन्हा उभे राहणार, अनेक संकटे पार पाडणार, अनेक दुःखे पचवणार, सर्व सुख मिळवणार, सर्वांना जोडणार, सर्वांना आपलंस करणार. हे सर्व घडवून आणणारं माझं मन हेच माझं प्रेम. माझं प्रेम हेच माझं मन.

तूच आहेस माझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहेस माझं समाधान.
तुझ्यामुळेच मी आज आहे, उद्या असेन आणि तुझ्यामुळेच मी या विश्वात कायम राहीन.
जेव्हा या सुंदर मनाला एखाद्याची भूरळ पडते, आपसुक ते त्या मनाला साद घालू लागते. आपसूक ते स्वतःच विश्व तयार करते. आपसूक ते वेगवेगळे ऋतु बनवते. ते हसते, रडते, खेळते, बागडते.

स्वतःवर प्रेम करणारा व्यक्ती संपूर्ण जग जिंकण्याची क्षमता ठेवतो. आणि म्हणूनच जे मन दुसऱ्या मनावर प्रेम करते ते स्वतःपेक्षा दुसऱ्या मनावर जास्त विश्वास ठेवते. अश्याच या निरागस मनाला माझं हे पुस्तक समर्पित " सांग ना सये....".

माझं मन तु आहेस नि तुझं प्रेम मी आहे. तुझ्या भावना मला समजतात, माझ्या संवेदना तुला कळतात, एवढे ते एकजीव आहेत.

माझे शब्द हेच माझ्या भावना, माझ्या संवेदना, माझे स्वप्न, माझे काव्य. आणि ते सर्व तुझ्याचसाठी आहेत " सांग ना सये...."

माझा पहिलाच कवितासंग्रह लवकरच तुमच्या सेवेत सादर करत आहे.



सांग ना सये पुस्तकाविषयी - प्रस्तावना

💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

बीजांना अंकुर फुटावे आणि रोपट्याचे स्वरूप घ्यावे तसेच शब्दांचे, शब्दांच्या काव्यसरीतून मन संवेदना अंकुर घेऊ लागतात आणि रोपट्या प्रमाणेच त्या बहरत जातात. याच संवेदना स्वप्न दाखवतात. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी देह आणि मन झटतात, झुरतात, एकवेळ हरून पुन्हा उठतात. जश्या संवेदना तसे काव्य बहरते. खरतर आयुष्य किती वेगवेगळ्या घटनांनी संवेदनांच्या गुंतागुंतीतून आकार घेत असत! हि गुंतागुंत मानवी मनाला एका वेगळ्या प्रवाहात घेऊन जात असते. आपण वाहत जातो आणि स्वतःला या जगापासून वेगळे समजू लागतो. कधीकधी आवडत्या व्यक्तीचा सहवास तर कधी एकांत हवाहवासा वाटू लागतो. कधी स्वतःशी तर कधी निसर्गाशी गप्पा मारू लागतो. मानवी मनाला हि भुरळ पडणे, हे आभास होणे, हेच तर प्रेम असते. कधी रागावणे, कधी रडणे, कधी हसणे तर कधी चिडणे हे संवेदनांचे प्रकटीकरण मनाच्या गुंतागुंतीतूनच तयार होते.

मी माझ्या कवितांमधून अश्याच वेगवेगळ्या संवेदनांचा आधार घेऊन प्रियकर आणि प्रेयसी मधील प्रेम भावना तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रियकर आणि प्रेयसी कोणीही असतील, अगदी कॉलेज मधील मुलं-मुली, तरुण युवक-युवती अथवा नवरा-बायको असोत. मनभावना त्यांच्या कृतींतूनच समोर येतात. प्रसंगानुरुप त्या भावना शब्दांत विणता आल्या तर काव्य घडतातच.



"सांग ना सये..." आवर्जून वाचाल आणि या प्रेम भावनांचा आनंद घ्याल अशी खात्री आहे.



ऋणनिर्देश, पावती

💖💖💖💖💖💖💖

त्या प्रत्येक क्षणांचा मी ऋणी असेंन ज्यांनी मला हसायला शिकवलं. त्या प्रत्येक घटनेचा मी ऋणी असेंन ज्या घटनांनी मला जगायला शिकवलं. त्या प्रत्येक घटकांचा मी ऋणी असेंन ज्यांनी मला उभं राहायला शिकवलं. त्या प्रत्येक प्रसंगांचा मी ऋणी असेंन ज्यांनी मला जिंकायला शिकवलं. त्या प्रत्येक शब्दांचा मी ऋणी असेंन ज्यांनी मला व्यक्त व्हायला शिकवलं. त्या प्रत्येक वेदनेचा मी ऋणी असेंन ज्यांनी मला संवेदनांची जाणीव करून दिली. त्या प्रत्येक भौतिक आणि अघटिक गोष्टींचा मी ऋणी असेंन ज्यांमुळे मी या निसर्गावर प्रेम करू शकलो.

नांदी, प्रस्तावना

💖💖💖💖💖💖💖

सागराच्या लहरींप्रमाणेच मनोमनीच्या भावना...
कधी खवळतात, कधी संथ होतात, कधी तटावर येऊन आदळतात तर कधी लाटांवरच विसावतात.
समुद्राच्या पाण्यातच त्या पुन्हा विलीन होतात आणि पुन्हा नवीन लाटा होऊन जन्म घेतात.
हा खेळ अविरत चालूच राहतो. ते खवळणे आणि शांत होणे हे आयुष्याचे सारं आहे. ते पुन्हा पुन्हा जन्म घेणे हे मनाचे सारं आहे.
ते लाटा होऊन तटाला गवसणी घालणे हे प्रेमाचे सारं आहे.

समुद्राच्या या अवखळ अविरत वागण्याला आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांशी, संवेदनांशी जोडून बघ, जो प्रत्यय येईल तो शब्दांत गुंफून बघ... आणि मग तुच सांग मला.... "सांग ना सये..."
© SURYAKANT_R.J.